मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी एक हजारांनी वाढला. तर, निफ्टीने २४ हजारांचा टप्पा गाठला. रिलायन्स, खासगी बँकांच्या समभागांची खरेदी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूक काल वाढल्याचे दिसले. त्याचे सकारात्मक परिणाम निर्देशांकावर झाले. सेन्सेक्स काल १ हजार ६ ने वाढून तो ८० हजारांवर गेला. गेल्या दोन दिवसांपूर्वी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली होती. आता मात्र, गुंतवणूक पुन्हा सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल गेले दोन दिवस सुरू होती. दरम्यान, सेन्सेक्स १ हजार ६ ने वाढून तो ८० हजार २१९ वर बंद झाला. निफ्टी २९० ने वाढून २४ हजार ३२८ वर पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग साडेपाच टक्क्यांनी वाढले. त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग अडीच टक्के वाढले. कंपनीने एसएमएल इसुझू कंपनी ५५५ कोटी रुपयांना खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. इसुझूच्या समभागातही दहा टक्के वाढ झाली. सन फार्मा, टाटा स्टील, स्टेट बँक, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, लार्सन अँड ट्रुब्रो आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग वाढले. या उलट एचसीएल टेक, अल्ट्रा टेक सिमेंट, नेसले आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग घसरले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे २ हजार ९५३ कोटींची गुंतवणूक शुक्रवारी केली आहे.
Fans
Followers